सुंदर असं जग बघण्यासाठी, त्याचा आनंद घेण्यासाठी निसर्गाने आपल्याला डोळे बहाल केलेत, त्यातही विशेष म्हणजे इतर कोणत्याही प्राण्यापेक्षा मनुष्यप्राण्याला सर्वाधिक रंग दिसतात. असे असले तरीही, हे रंगीत जग आता रंगीत डोळ्यांनीच बघण्याची क्रेझ सध्या सगळीकडे आलेली आहे. आपल्या डीएनएनुसारच आपल्या डोळ्यांच्या बुब्बुळाचा नैसर्गिक रंग असतो. कुणाचा तो काळा, करडा, राखाडी, तपकीरी अगदी निळाही असू शकतो. पण बहुतांश डोळे हे काळे किंवा तपकीरी रंगाकडे झुकलेले असतात. पण त्यांचाही रंग बदलणे कॉन्टॅक्‍ट लेन्सच्या साह्याने सहजच शक्‍य आहे. अशा लेन्स वापरल्याने डोळ्यांच्या आरोग्याला फार धोका निर्माण होत नाही. मात्र डोळ्याच्या नैसर्गिक रचनेमध्ये कृत्रिम घटक टाकून आपण जाणीवपूर्वक बदल करत असल्याने काही काळजी घेणे आवश्‍यकच आहे. त्यासाठी कॉन्टॅक्‍ट किंवा कॉस्मेटीक लेन्स म्हणजे काय हे समजून घेणे आवश्‍यक आहे.

चष्म्याऐवजी या लेन्स वापरण्याचे प्रमाण मोठे आहे. तसेच डोळ्यांवर मोतीबिंद किंवा तत्सम शस्त्रक्रीया झाल्यावरही अशा लेन्स आरोग्याच्या दृष्टीने गरज म्हणून डोळ्यांच्या बुब्बुळावर वापरल्या जातात. मात्र दुसऱ्या प्रकारात केवळ डोळ्यांचे सौदर्य वाढावे, हा एकमेव उद्देश ठेऊन अशा प्रकारच्या लेन्स वापरल्या जातात. यात आता वावगे काही राहीलेले नाही. डोळ्यांना अगदी निळा, हिरवा, चंदेरी किंवा अगदी आपल्याला हवा तसा रंग या लेन्समध्ये आपल्याला मिळू शकतो.

लेन्सचे प्रकार

कॉन्टॅक्‍ट लेन्स तीन प्रकारात येतात. गरजेनुसार त्या वापरल्या जातात.

सॉफ्ट लेन्स

या प्रकारातील लेन्सचा सर्वाधिक वापर होतो. अत्यंत उच्च प्रतिच्या सामुग्रीपासून याची निर्मिती केलेली असते. यामुळे डोळ्यांना आराम तर मिळतोच पण अधिक काळापर्यंत वापरण्यासाठी त्या तयार केलेल्या असतात. यात डिझाईनही उपलब्ध होत आहेत. याचेही उपप्रकार आहेत:

 • डेली डिस्पोजेबल : एकदा वापरून टाकुन देण्यासाठी या लेन्स बनवलेल्या असतात. सोप्या भाषेत सांगायचे तर युज ऍण्ड थ्रो.
 • विकली डिस्पोजेबल : आठवडाभर वापरल्यानंतर या लेन्सची कार्यक्षमता संपते. त्यामुळे त्या आठवड्याभरानंतर टाकून द्याव्या लागतात.
 • मंथली डिस्पोजेबल : या लेन्सचे आयुष्य महिनाभराचेच असते.. त्यानंतर त्या बदलाव्या लागतात.
 • एक्‍सटेंडेड वियर : लेन्स तयार करण्याच्या प्रकारामधील हा सर्वात अद्ययावत असा प्रकार आहे. हायड्रोजेलपासून या लेन्स तयार केलेल्या असतात. त्यामुळे त्यांची कार्यक्षमता प्रचंड वाढलेली असते. डोळ्यांना ऑक्‍सिजनचा पुरवठा होताना कोणताही अडथळा होत नसल्याने या लेन्स खुपच आरामदायक ठरतात.

गॅस परमेयबल लेन्स

या प्रकराच्या लेन्सला हार्ड लेन्स किंवा जीपी असेही म्हटले जाते. या लेन्समध्ये पाणी नसते, मात्र तरीही डोळ्यांसाठी अशा प्रकारच्या लेन्स आरामदायक असतात. मोठ्या कालावधीसाठी वापरण्यासाठी या लेन्स फायदेशीर असतात. सध्या त्याचा वापर कमी झाला असला तरी डोळ्यांच्या काही आजारांसाठी अद्यापही याचाच वापर केला जातो.

रंगीत लेन्स

केवळ सौंदर्य वाढविण्यासाठी शून्य नंबर आणि विविध रंगात या उपलब्ध असतात. वर उल्लेख केल्याप्रमाणे त्यांची कार्यक्षमता ठरलेली असते.

कॉन्टॅक्‍ट लेन्स कशा वापराव्यात ?

 • साबणाने हात स्वच्छ धुवून, ते स्वच्छ टॉवेलने कोरडे करावेत
 • लेन्स स्वच्छ करण्यासाठी ती सोल्यूशनमध्ये धुवून घ्यावी
 • लेन्स सर्वात आधी मधल्या बोटावर घ्यावी
 • ती उलटी होऊ देवू नये
 • डोळ्याच्या पापण्या पकडून बब्बुळाच्या वर किंवा खाली लेन्स ठेवावी
 • त्यानंतर डोळे बंद करून घावेत
 • बंद डोळे आतल्या आत हलवावेत म्हणजे लेन्स बरोबर बुब्बुळावर बसू शकेल.

लेन्स वापरण्याचे तोटे

 • डोळे आणि डोके दुखी
 • अस्पष्ट दिसणे
 • प्रकाशाचा त्रास होणे
 • डोळे लाल होणे
 • डोळ्यातून सतत पाणी येणे
 • डोळ्यांमध्ये अल्सर होणे
 • डोळ्यांमध्ये संसर्गाचा धोका

लेन्स वापरण्याचे फायदे

 • चष्म्याला उत्तम पर्याय
 • कमी प्रकाशातही स्वच्छ दिसू शकते
 • लेन्स डोळ्याच्या आत असल्याने ती कायम स्वच्छ राहते
 • लेन्स व्यवस्थित बसल्यानंतर ती पडत नाही
 • याद्वारे नैसर्गिक लूक मिळू शकतो

डोळे हा आपल्याला निसर्गाने बहाल केलेला एक चमत्कार आहे. त्यामुळे डोळे जेवढे नैसर्गिक राहतील तेवढी त्यांची सुदृढता राहू शकते. गरजेच्या वेळी लेन्स वापरणे ठिकच.. मात्र त्याचा अतिरेक होणार नाही, याचीही आपण काळजी घेतली पाहीजे.

  BOOK NOW CALL NOW  CHAT