डोळे अन दृष्टी हे सृष्टीने मनुष्याला दिलेले सर्वात मोठे वरदान... आपल्या प्रत्येक क्रीयेची सुरवात ही डोळ्यांपासून सुरू होते आणि डोळ्यांनीच संपते, हे त्याचे महत्त्वाचे कारण. नजरेची भाषा म्हंटल की आपल्याला लगेचच त्याचा बोध होतो. नजर अन डोळ्याच्या हावभावातून बोलण्याची कला प्रत्येकालाच उपजत असते. फक्त त्याचा वापर कोण कसा करतो, यावर सगळं अवलंबून असतं. त्यामुळेच डोळे महत्त्वाचेच ! त्यासाठी लहानपणापासून डोळ्यांची काळजी घेणे आवश्‍यक असते. लहान मुलांच्या डोळ्यांची काळजी तर कटाक्षाने घ्यायला हवी.

आपण तळ हाताच्या फोडाप्रमाणे मुलांना जपत असतो. पण त्यातही त्यांच्या डोळ्यांची काळजी घेताना काही गोष्टी प्रकर्षाने पाळणे गरजेचे असते. चिमुकल्यांच्या डोळ्यांची काळजी नेमकी कशी घ्यावी? याची चर्चा आपण करणार आहोत...

तिरक्‍या नजरेकडे द्या लक्ष

घरात वावरतांना मुले जर तिरक्‍या नजरेने पहात असतील, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. त्यांच्या डोळ्यात तिरळेपणा निर्माण होण्याची शक्‍यता अधिक असते. त्यामुळे त्याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यायला हवे. लहान मुलांच्या डोळ्यातील तिरळेपणा मोठ्या व्यक्तींच्या तुलनेत लवकर जाऊ शकतो. योग्य व्यायामांच्या साह्याने हे सहज शक्‍य आहे. परंतु याचे निदान आणि उपचार हे नेत्ररोग तज्ज्ञाकडूनच करून घ्यायला हवेत.

काजळ ठेवा दूर

आपल्याकडे लहान अर्थात तान्ह्या बाळाला काजळ घालण्याची प्रथा आहे. मुळात तान्ही बाळं ही अतिशय नाजुक असतात. त्यांची काळजी घेणे गरजेचे असते. त्यातच त्यांचा डोळा हा तर अधिकच नाजुक. त्याची तर विशेष काळजी घेणे गरजेचे असते. मात्र आपल्याकडे प्रथेचा भाग म्हणून तान्ह्या बाळाच्या डोळ्यात काजळ घातले जाते. त्यामुळे डोळे चुरचुरणे, खाजणे, डोळ्यातून पाणी येणे अथवा डोळ्यात संसर्ग होण्याची शक्‍यता असते. तसेच काजळ कोणत्या दर्जाचे आहे, शिवाय ते घालणाऱ्या व्यक्तीच्या हाताची बोटे कितपत स्वच्छ आहेत, हे देखील खुप महत्त्वाचे आहे. या गोष्टीमुळे डोळे अधिकच असुरक्षित होतात.

तान्ह्या बाळांचे डोळे

अनेकदा तान्ह्या बाळांच्या डोळ्यातून पिवळा अथवा पांढऱ्या रंगाचे पाणी येत असते. अशा वेळी कोरडा स्वच्छ कापसाचा बोळा पाण्यात बुडवून ओला करावा, त्यानंतर बाळाचे डोळे पुसून घ्यावेत. आतून बाहेर अशा पद्धतीने हे डोळे पुसावेत. डोळे पुसताना त्यावर जोर देऊ नये. हलक्‍या-नाजुक हाताने डोळे पुसावेत, असे दिवसातून किमान दोनदा करावे. डोळ्याभोवती बोटाने हलका दाब देत मसाज करावा. बाळाचा जन्म वेळेआधी झाला असेल, तर रूग्णालयात असतानाच बाळाच्या डोळ्यांची तपासणी करून घ्या. त्यानंतर पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्या वर्षी नियमितपणे बाळाच्या डोळ्यांची तपासणी करणे आवश्‍यकच आहे.

तीक्ष्ण गोष्टींपासून जपा

लहान मुलांना जाणीवपूर्वक तीक्ष्ण वस्तूंपासून दूर ठेवावे. त्याचे धोके त्यांना समजावून सांगावेत. कोणत्याही तीक्ष्ण वस्तूशी त्यांना खेळू देऊ नये. खेळण्यातील धनुष्याचा बाण, खेळण्यातील बंदुकीची गोळी, पेन, पेन्सिल, टाचण्या यासारख्या वस्तूंचा वापर योग्य पद्धतीने होण्यासाठी लहान मुलांना त्याची माहीती द्यायला हवी. पालकांनीही या बाबींकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. तीक्ष्ण वस्तूचा मार डोळ्याला लागल्यामुळे इजा होऊन दृष्टी गेल्याची अनेक उदाहरणे आहेत.

पुरेसा उजेड महत्त्वाचा

आपण राहात असलेल्या खोलीत पुरेसा उजेड असायला हवा. सतत कमी उजेडात काम करू नये. लहान मुलांच्या खोल्यांमध्येही पुरेसा उजेड असावा. अती प्रखर अथवा अपुऱ्या उजेडात मुलांनी अभ्यास करू नये. अथवा खेळू देखील नये. त्यामुळे डोळ्यांवर अतिरिक्त ताण येण्याची शक्‍यता आहे.

गुलाल अन फटाके टाळा

आनंदाच्या क्षणी किंवा जत्रेत आपण लहान मुलांना उत्साहाने घेऊन जातो. मात्र तिथे उधळण्यात येणारा गुलाल हा त्यांच्या डोळ्यांना अधू बनवू शकतो. दिवाळीतही पालक किंवा मुले उत्साहाच्या भरात फटाके वाजवत असतात. त्यावेळी निर्माण होणाऱ्या ठिणग्या किंवा फटाक्‍यातील दारूमुळेही डोळ्यांना मोठी इजा झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे यापासून मुलांना दुर ठेवलेलेच बरे.!

डोळे आणि भ्रम

मुलांना सतत चष्मा घातल्याने तो सुटू शकतो, व्हीटॅमीनचे औषधे घेऊन डोळे चांगले होतात किंवा दृष्टी सुधारते, गरोदरपणात आईने जास्त टिव्ही बघितला तर बाळाला नंतर चष्मा लागतो, इनक्‍युबेटरमध्ये असणाऱ्या बाळांचे डोळे तिरळे होतात... अशा आणि यापेक्षाही वेगळ्या अनेक भ्रामक कल्पना आपल्या समाजात रूजलेल्या आहेत. मात्र यावर विश्‍वास न ठेवता नेत्रतज्ज्ञाच्या सल्ल्यानेच औषधोपचार करायला हवा.

  BOOK NOW CALL NOW  CHAT